अरिस्टॉटल हा ग्रीक विद्वान म्हणतो… स्वत:ला ओळखणे म्हणजे ज्ञानप्राप्तीची सुरुवात! - स्वत:ला आरपार ओळखून, स्वत:ला स्वत:साठी स्वत:कडून, नेमके काय पाहिजे आहे याचा निरंतर न थकता शोध घेणे म्हणजे यशाच्या अधिकाधिक जवळ जाणे… थोर साहित्यिक विल्यम शेक्सपियर म्हणतो... इतरांपेक्षा स्वत:ला जास्त ओळखा! गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाप्रमाणे, ज्याने स्वत:ला जेंव्हा ओळखले तेंव्हाच त्याने जग जिंकले. आपले सर्व संत महात्मे यांनी देखील आपल्या श्लोक अभंगातून हेच सांगितले आहे...
थोडक्यात यशस्वी, प्रसिद्ध, श्रीमंत, आदर्श होण्यासाठी स्वत:ला ओळखणे हे आजच्या काळात प्रचंड आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःला ओळखून आहे तसे स्विकारतो तेव्हा आपण स्थिर होतो आणि जेव्हा आपण स्वत:ला स्वीकारून हवे तसे घडवतो तेव्हा आपण अजिंक्य होतो.
स्वत:ला ओळखून स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडविण्याची ही प्रक्रिया म्हणजेच पर्सनल ब्रँडिंग.
व्यक्तिमत्व विकास म्हणजे स्वत:ची ओळख तयार करणं. स्वत:चा ब्रँड तयार करणं. एक व्यावसायिक या नात्याने जोपर्यंत आपण आपला सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करत नाही, आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत नाही, तावून सुलाखून पैलू पाडत नाही आणि आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करत नाही तोपर्यंत आपण स्वत: आणि आपला व्यवसाय देखील विशेष ओळखला जाणार नाही. हे माझे अभ्यासातून, स्वानुभवातून आणि निरीक्षणातून तयार झालेले मत आहे.
आजच्या स्पर्धात्मक डिजिटल युगात आपला उद्योग व्यवसाय फुलवण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली आगळी-वेगळी, ठळक, उठावदार, प्रभावी अशी जबरदस्त वैयक्तिक ओळख अर्थात आपला पर्सनल ब्रँड तयार करणे, तो अधिकाधिक समृद्ध करणे, स्थिरस्थावर करणे आणि कायम लोकप्रिय ठेवणे अत्यावश्यक ठरते.
ही ओळख म्हणजे केवळ आपले नाव नसून, आपल्या विचारांचा, मूल्यांचा, भूमिकांचा, दृष्टिकोन, ध्येय-धोरणे, आणि विश्वासाचा एकत्रित प्रवाह असतो. एक चांगला वैयक्तिक ब्रँड म्हणजे असा अनुभव असतो जो लोकांच्या मनात आपला ठसा उमटवतो. त्यामुळे आपण ज्या व्यवसायात आहोत, त्यात लोकांना आपल्याशी जोडण्यास प्रवृत्त करतो. या ओळखीला बळ देण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी नेटवर्किंग हे अत्यंत महत्वाचे साधन ठरते.
नेटवर्किंग म्हणजे केवळ व्यावसायिक संपर्कांची यादी वाढविणे नाही, तर ती एक उर्जायुक्त अशी दीर्घ प्रक्रिया आहे. नेटवर्किंगच्या माध्यमातून आपला वैयक्तिक ब्रँड तयार करणे, त्याचा प्रभाव वाढवणे आणि त्यात सातत्य ठेवणे हा एक सातत्यपूर्ण प्रवास आहे. नेटवर्किंगमध्ये केवळ ओळखी वाढवणे हेच उद्दिष्ट नसून, परस्परांशी घनिष्ठ नाते तयार करणे महत्वाचे असते. नेटवर्किंग माध्यमातून व्यवसाय वाढविण्यासोबतच एकमेकांना प्रेरणा देणे, शिकणे, शिकवणे आणि यशासाठी परस्परांना सहकार्य करणे हे देखील महत्वाचे आहे. व्यवसायात एक विश्वासार्ह, अनुभवी, आणि सहकार्यशील व्यावसायिक म्हणून आपली ओळख निर्माण करणं ही आपल्या यशाची किल्ली ठरते. मात्र, आणि हे साध्य करायला नेटवर्किंग मात्र हवेच.
वैयक्तिक ब्रँडिंग म्हणजे स्वत:सोबत झालेली घट्ट मैत्री तर नेटवर्किंग म्हणजे इतरांशी झालेली घट्ट मैत्री. थोडक्यात हा मैत्रीचा महोत्सव आणि विजयाचा आनंदोत्सव आहे.
चला तर मग, वैयक्तिक ब्रँडिंग व नेटवर्किंगचे परस्पर संबंध, त्यांचे फायदे, आणि त्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स बघूया.
वैयक्तिक ब्रँडिंग आणि नेटवर्किंग: एक परस्परपूरक नाते!
वैयक्तिक ब्रँडिंग आणि नेटवर्किंग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसे एखाद्या वृक्षाची मुळे त्याला आधार देतात, त्याचप्रमाणे आपली ओळख तयार करण्यामध्ये वैयक्तिक ब्रँडिंगचा सहभाग असतो, तर ती ओळख टिकवून ठेवण्यासाठी नेटवर्किंगची भूमिका महत्वाची असते. वैयक्तिक ब्रँडिंगच्या माध्यमातून आपण आपले मूल्य, आपली ताकद, आणि आपल्या व्यवसायाच्या संकल्पना इतरांपर्यंत पोहोचवतो. हे एक प्रकारचे साध्य आहे, जिथे आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडतो.
वैयक्तिक ब्रँडिंगमुळे आपण समोरच्या व्यक्तीला एक विशिष्ट अनुभव देतो. एखादा आपल्याला समजून घेतो, आपल्यावर विश्वास ठेवतो, आणि आपल्या मूल्यांशी एकरूप होतो. नेटवर्किंगद्वारे आपले हे मूल्य लोकांपर्यंत पोहोचते. आपण आपल्या ओळखीची रुंदी वाढवू शकतो, नवी नाती निर्माण करू शकतो, आणि त्यामधून आपली ओळख अधिक दृढ करू शकतो.
एक सकारात्मक दृष्टिकोन, आपल्या व्यवसायाबद्दल प्रामाणिकता, सहकार्याची वृत्ती, आणि सेवा करण्याची सिद्धता दाखवून आपण लोकांमध्ये एक प्रेरणा निर्माण करतो. त्याचबरोबर, नेटवर्किंग हे एक सहकार्याचे व्यासपीठ असते. येथे आपण परस्परांना ऊर्जा देतो, परस्परांच्या यशात खरेखुरे योगदान देतो.
यामधूनच एक सशक्त आणि दीर्घकालीन नाते निर्माण होते. आपण जेंव्हा आपल्या व्यवसायाबद्दल विचार करत असतो, तेंव्हा तो व्यवसाय केवळ एक सेवा देण्याचे साधन न राहता, आपली एक ओळख निर्माण करणारा एक आधार बनतो. आपल्याला फक्त आपला व्यवसाय वाढवायचा नसतो, तर एक अशी ओळख निर्माण करायची असते जी आपल्या अस्तित्वाला, आपल्या मूल्यांना कायमस्वरूपी टिकवून ठेवेल.
वैयक्तिक ब्रँडिंग आणि नेटवर्किंग: एक अविरत प्रवास!
"वैयक्तिक ब्रँडिंग हे आत्मिक आणि बौद्धिक सामर्थ्य आहे, तर नेटवर्किंग हे सामाजिक आणि व्यावसायिक सामर्थ्य आहे."
वैयक्तिक ब्रँडिंगचा प्रवास सुरु झाला की, प्रत्येक नव्या संपर्काने ती ओळख अधिक गहिरी होत जाते. प्रत्येक व्यवसायात अनेक आव्हाने येत असतात, परंतु नेटवर्किंगमुळे आपण अशा लोकांशी जोडले जातो, जे त्या आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला मदत करतात, मार्गदर्शन करतात. हे सहकार्य आपल्याला फक्त एक व्यावसायिक म्हणूनच नव्हे, तर एक माणूस म्हणूनही संपन्न बनवते.
प्रत्येक भेट, प्रत्येक चर्चेतून शिकण्याचा अनुभव घेऊन आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाला संपन्न करतो आणि तेच आपल्या वैयक्तिक ब्रँडिंगला अधिक बळ देते. हे बळ म्हणजेच आपल्या व्यवसायाच्या यशाचा मार्ग आहे. जसा आपण एकमेकांशी नवीन नातेसंबंध निर्माण करतो, तसेच आपल्या कार्यप्रणालीत नवीन विचार, नवीन अनुभव मिसळून एक सातत्यपूर्ण आणि विकसित करणारा प्रवास सुरु होतो.
वैयक्तिक ब्रँडिंग आणि नेटवर्किंगचे हे समर्पक नातेच आपल्या व्यवसायाच्या आणि जीवनाच्या यशाचा मूलमंत्र आहे.
आपला वैयक्तिक ब्रँड नेटवर्किंगद्वारे कसा तयार करावा?
१. आपला संदेश स्पष्ट ठेवा.
आपला वैयक्तिक ब्रँड हा सुस्पष्ट असायला हवा. आपण कोण आहोत, काय करतो, आणि आपल्याला काय साध्य करायचे आहे, हे स्पष्ट असावे. प्रत्येक नेटवर्किंग संधीचा योग्य वापर करून आपली ओळख वाढवा, आपला संदेश प्रभावी पद्धतीने पोहोचवा.
२. नियमितता राखा.
नेटवर्किंग हा सततचा प्रवास आहे. त्यासाठी नियमितपणे नेटवर्किंग मिटिंग्समध्ये सहभागी व्हा. यामुळे इतरांशी ओळखी टिकून राहतात आणि सातत्यपूर्ण उपस्थितीमुळे आपला आणि आपल्या व्यवसायाचा ब्रँड दोन्ही लोकांच्या मनात खोलवर रुजतात.
३. वेगळेपण जपणे.
आनंदी आणि हसतमुख राहा. प्रत्येकाला आवर्जून भेटा. भेटीमध्ये आपले व्यक्तिमत्व आणि व्यवसायातील वैशिष्ट्ये अधोरेखित करा. आपल्यामध्ये असलेले वेगळेपण जतन केल्यास आपला ब्रँड इतरांपेक्षा नक्कीच प्रभावी आणि परिणामकारक ठरेल.
४. उपयुक्तता दाखवा.
आपला व्यवसाय इतरांसाठी कसा उपयुक्त आहे हे पटवून देणे आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायामुळे इतरांना काय फायदे होऊ शकतात, त्यांचे जीवनात सकारात्मक बदल कसे होऊ शकतात, हे दाखवून दिल्यास लोकांचा आपल्यावर अधिक विश्वास बसेल.
५. विश्वास निर्माण करा.
विश्वास हाच यशाचा पाया आहे. आपल्या नेटवर्कमध्ये विश्वासार्हता निर्माण करा. आपली शिस्त, वचनबद्धता, प्रामाणिकपणा, मदत करण्याची तयारी, उत्साह, स्वभाव असे अनेक गुण पाहून लोक आपल्यावर विश्वास ठेवतील, ज्यामुळे आपली ओळख बळकट होईल.
६. परस्पर सहकार्य करा आणि प्रेरणा द्या.
नेटवर्किंगमधून सहकार्याची वृत्ती वाढवा. आपण एकमेकांना प्रेरणा देऊन, शिकवून आणि एकत्र काम करून अधिक यशस्वी होऊ शकतो. एकमेकांवर विश्वास ठेवून कार्य केले, तर त्यातूनच मजबूत नाते निर्माण होऊ शकते.
७. शिकण्याची वृत्ती ठेवा.
प्रत्येक नेटवर्किंग मिटींगमधून काहीतरी नवीन शिकण्याची तयारी ठेवा. इतरांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांच्याकडून शिकण्याची वृत्ती ठेवा. हे शिकण्याचे अनुभव आपल्याला अधिक कणखर बनवतात.
८. सकारात्मकता ठेवा.
नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आपले आनंदी व सकारात्मक व्यक्तिमत्त्वच इतरांना आपल्याकडे आकर्षित करते. हा सकारात्मक दृष्टीकोन तुमच्या ब्रँडला प्रोत्साहन देतो, ज्यामुळे इतर लोक तुमच्यासोबत जोडले जातात.
९. संवाद कौशल्याचा विकास करा.
आपले संवादकौशल्य आपल्या वैयक्तिक ब्रँडचे प्रतिबिंब असते. स्पष्ट, आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंवादी पद्धतीने संवाद साधा. आपले शब्द, आपला आवाज आणि आपला आत्मविश्वासच इतरांना आपल्याकडे आकर्षित करतो.
१०. एक मिनिटाचे प्रभावी पिच तयार ठेवा.
आपला व्यवसाय, आपले उद्दिष्टे आणि आपली ओळख एका मिनिटात स्पष्ट करणे आवश्यक असते. प्रभावी पिच तयार ठेवा, त्याचा सराव करा. जेणेकरून आपण कधीही आपल्या व्यवसायाची ओळख प्रभावीपणे सांगू शकतो.
नेटवर्किंगमुळे व्यवसायाला मिळणारे फायदे
नेटवर्किंग हे केवळ व्यवसायाच्या प्रमोशनसाठी नसते, तर त्यातून विश्वासाचे नाते निर्माण होऊन व्यवसाय वृद्धीला चालना मिळते. नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण इतरांना आपले आणि आपल्या व्यवसायाचे महत्व पटवून देऊ शकतो. काही महत्वाचे फायदे:
विस्तारित ओळख: नियमित नेटवर्किंग मिटींग्समुळे व्यवसायाची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते.
व्यावसायिक कार्डांची देवाणघेवाण: व्यावसायिक कार्डाद्वारे आपण इतरांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देऊ शकतो.
सादरीकरणाच्या संधी: नेटवर्किंगमध्ये एक मिनिटे किंवा 10 मिनिट सादरीकरण करताना, आपली ओळख प्रभावी पद्धतीने मांडता येते.
प्रत्यक्ष भेटींच्या संधी: इतर व्यावसायिकांना 1-2-1 भेटण्याची संधी मिळते, ज्यामुळे आपले नाते अधिक दृढ होते.
विश्वासार्हता वाढवणे: परस्पर विश्वासाचे नाते निर्माण होऊन आपला ब्रँड अधिक विश्वासार्ह बनतो.
व्यावसायिक मैत्री: नेटवर्किंगमुळे व्यवसायातील इतर व्यावसायिकांशी घनिष्ठ मैत्री होते.
शिकण्याची संधी: विविध व्यावसायिकांपासून वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची संधी मिळते.
प्रोत्साहन व प्रेरणा: इतर व्यावसायिकांचे ज्ञान, अनुभव आणि यशातून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते.
सहकार्य आणि एकत्र काम: एकत्र काम करण्याच्या मानसिकतेमुळे व्यावसायिक सहकार्य वाढते.
मुल्यवर्धित नातेसंबंध: इतर व्यवसायांशी केलेली सहकार्यपूर्ण ओळख आपल्या व्यवसायाला व वैयक्तिक ब्रँडला बळ देते.
अशा पद्धतीने नेटवर्किंगच्या माध्यमातून केवळ व्यवसाय वृद्धी होत नाही तर आपल्या वैयक्तिक ओळखीला एक विशिष्ट विश्वास, आदर आणि प्रतिष्ठा मिळते. या ओळखीतूनच व्यवसायात यशाची नवीन क्षितिजे खुली होतात, आणि आपला सेल्फ ब्रँड दीर्घकाळासाठी स्थिर होतो. आपल्या परस्पर नातेसंबंधातून एक ऊर्जा निर्माण होते, एक विश्वासाची भावना निर्माण होते, जी आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाते. म्हणूनच आपली आगळी वेगळी सेल्फ इमेज तयार करण्यासाठी, फुलवण्यासाठी आणि सतत वाढवत नेण्यासाठी नेटवर्किंगला आपल्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनवा.
ब्रॅंडबॉन्ड निलेश B+
Creative Designer, Brand Consultant, Coach, Mentor, Trainer, Speaker & Author
8879 230 443