थिंक पॉझिटिव्ह - दिवाळी अंक 2021
विषय - नाते
"उद्योगऊर्जा - आपला बिझनेस कट्टा" - विविधरंगी विविधढंगी नात्यांचे समृद्ध आणि अर्थपूर्ण जाळे!!!
आपल्याला आनंद देणारं नातं कोणतं आहे याबद्दल लिहायचे आहे आणि त्याच नात्यातील एक खंतही मांडायची आहे. असा अतिशय मजेशीर आणि तितकाच आव्हानात्मक असा हा विषय आहे.
माणुस म्हटलं की नातं हे आलंच. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्ती सोबत आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं नातं तयार होत असतं. काही रक्ताची नाती सोडल्यास आपल्या आयुष्यातील इतर महत्वाची नाती म्हणजे बायको, मित्र-मैत्रीण, नातेवाईक. शेजारी, सहकारी, हितचिंतक, शिक्षक, विद्यार्थी, जात, धर्म, समाज, भाषा, गांव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, आदर्श व्यक्ती, संस्था, त्याचबरोबर नोकरी, व्यवसाय, कला, छंद, निसर्ग, प्राणी-पक्षी, ध्येय, उद्देश, स्वप्नं, सेवाकार्य, अशी कोणत्याही प्रकारची शेकडो नाती आपल्या आयुष्यात असतात.. काही नाती आनंद देतात, काही दु:ख, काही समाधान काही त्रास, काही नाती चांगला अनुभव देतात काही वाईट, काही नाती शिकवतात काही नाती पकवतात... काही नाती घडवतात काही बिघडवतात. यापैकी एका जबरदस्त आनंददायी विविधरंगी विविधढंगी नात्याबद्दल मी व्यक्त होत आहे. अर्थात या नात्याच्या परिघातल्या जाणिवा आणि उणिवा यांची उजळणी मी या निमित्ताने करणार आहे. दिल्या ,घेतल्याचा हिशोब नव्हे तर काय गवसले , काय निसटले यांची मनी याद ठेवणार आहे.
"उद्योग☀ऊर्जा- आपला बिझनेस कट्टा" हे व्यासपीठ, हा कट्टा त्यांच्यासाठी आहे... जे स्वतंत्र व्यवसाय सुरु करू इच्छित आहेत... जे स्वत:च्या व्यवसायात जिद्दीने धडपडत आहेत... जे आपल्या व्यवसायात यशस्वीपणे स्थिरस्थावर झाले आहेत... अशा सर्व क्षेत्रातल्या, सर्वच लहान-मोठ्या व्यावसायिकांकरीता यशाची जबरदस्त जादू... आणि सकारात्मक ऊर्जेचा उगम... म्हणजे "उद्योग☀ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा !!! उद्योग... धंदा... व्यवसाय... पैसा... प्रसिद्धी... प्रेरणा... प्रोत्साहन... उत्साह... ऊर्जा... मैत्री... श्रीमंती... प्रगती... नाती आणि बरंच काही... म्हणजे "उद्योग☀ऊर्जा" - आपला बिझनेस कट्टा!!!
या संस्थेचा सह-संस्थापक या नात्याने मला गेल्या १००० दिवसांत प्रचंड समृद्ध केलं आहे. या नात्याने माझ्यातील नेतृत्व गुणांचा वेळोवेळी कस लावला आहे. मला माणुस म्हणुन घडवलं आहे. हे नातं एकाचवेळी प्रचंड आनंदाचं, अभिमानाचं आणि जबाबदारीचं आहे. हे नातं एकाचवेळी अनेकांशी आहे. हे केवळ नाते नाही तर अनेक नात्यांचे समृद्ध आणि अर्थपूर्ण जाळे आहे. मुळात "उद्योग☀ऊर्जा" हा एक बिझनेस नेटवर्किंग क्लब आहे. नेटवर्किंग म्हणजे जाळे. एक व्यावसायिक, दूसरा व्यावसायिक असे करता करता शेकडो-हजारो व्यावसायिकांचा एक समूह. हा समूह म्हणजे मानवी नातेसंबंधाचा आनंदोत्सव!!!
हे अद्भुत नाते समजून घेण्याआधी 'नातं' या शब्दाची सोपी व्याख्या जी मला जाणवली ती सांगतो. कोणत्याही दोन वा अनेक व्यक्ती किंवा गोष्टी यांच्यातला "अर्थपूर्ण" संबंध म्हणजे नातं! यातल्या 'अर्थपूर्ण' या शब्दाला खरं महत्व आहे. त्याच्या जागी इतर शब्द त्यांच्या अर्थासह येऊन बसायला लागले की ही व्याख्या बदललीच म्हणून समजावं. जसं की, 'कामापुरते', 'अप्पलपोटी', 'एकतर्फी', 'बळजबरीचे', 'भीतीयुक्त', 'नावापुरते', 'तात्पुरते'... इत्यादी शब्द. यातला कुठलाही शब्द 'अर्थपूर्ण' ऐवजी घालून पुन्हा वरची व्याख्या वाचली म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात येईल.
'अर्थपूर्ण'चा मला उमगलेला अर्थ... ज्यामुळे त्या नात्याशी बांधल्या गेलेल्या संबंधित व्यक्तींच्या एकुणच जगण्यात अतिशय महत्त्वपूर्ण आणि परिपूर्ण असा 'अर्थ' निर्माण होतो. आयुष्य सकारात्मकतेने जगण्याची ऊर्जा निर्माण होते, वाढत राहते आणि टिकून राहते. व्यक्ती म्हणून अशा नात्यात बांधला गेलेला प्रत्येक घटक प्रगल्भ होण्याची सुरुवात आणि मदत होते. सहाजिकच निर्माण होणाऱ्या काही भावना त्याच्या मुळाशी असतात. जसे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकमेकांविषयी असणारी काळजी, आदर, उत्कंठा, नवलाई, विश्वास, सुरक्षितता इत्यादी. या भावना अशा नात्यांमध्ये केवळ टिकून न राहता काळासोबत वृद्धिंगत होतात. हे सर्व माझ्या "उद्योगऊर्जा" सोबतच्या नात्यामध्ये घडत आहे आणि ते मी रोज अनुभवत आहे.
"उद्योग☀ऊर्जा" आपला बिझनेस कट्टा! या नात्याचा केंद्रबिंदु आहे... "ऊर्जा"
चला भेटुया… परस्परांना "ऊर्जा" देऊया... (हे संस्थेचे बोधवाक्य आहे) आणि कितीही व्यस्त, अस्वस्थ आणि बंदिस्त असलो तरीही स्वस्थ, मस्त, जबरदस्त, तंदुरुस्त, भारदस्त, बिनधास्त, निर्धास्त आणि श्रीमंत जगुया...☺!!! ही साधारणपणे संस्थेची संकल्पना (ब्रॅंड स्टोरी) आहे. एकत्र येणे ही सुरुवात... एकत्र राहणे ही प्रगती.. आणि एकत्र काम करणे म्हणजे विजय!!! या नात्याने "उद्योग☀ऊर्जा" संस्थेमध्ये व्यावसायिक जोडले जातात (Connect)... एकमेकांना भेटतात (Meet)... ओळख वाढवतात. मैत्री करतात (Friendship)... एकमेकांचे व्यवसाय समजुन घेतात (Understanding)... एकमेकांना उत्साहित-प्रोत्साहित करतात (Inspire-Energize), शिकवतात. शिकतात. (Educate... Learn), परस्परांना आपल्या ओळखीतले व्यावसायिक संदर्भ देतात (Reference), प्रत्यक्ष खरेदी-विक्री करतात (Done Deal), परस्परांना सहकार्य करतात (Co-operate), जिंकतात आणि जिंकायला मदत करतात (Win-Win). २० ऑक्टोबर २०१८ साली डोंबिवली येथे २८ व्यावसायिकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पहिल्या कट्टा मिटिंग पासून आज ८६ व्या online कट्ट्यापर्यंत अंदाजे १५०० व्यावसायिक संस्थेसोबत जोडले गेले आहेत आणि एकूण १००० पेक्षा अधिक व्यवहारांच्या (डनडील्स) माध्यमातून तब्बल ३.५ करोड पेक्षा अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे.
हा एक प्रारंभ आहे... एका विशिष्ट ध्येयाने... उद्देश्याने... प्रेरीत होऊन एकदिलाने एकत्र येण्याचा... माणसं जोडण्याचा.. नाती विणण्याचा... बंध मजबूत करण्याचा... थोडक्यात हा सकस, सुदृढ आणि समृद्ध नातेसंबंधांचा एक आनंददायी उत्सव आहे. संस्थेचा सह-संस्थापक, प्रमुख संचालक या नात्याने संस्थेशी या ना त्या मार्गाने जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी माझे देखील वैयक्तिक असे ऋणानुबंध तयार होतात. व्यावसायिक सल्ले दिशा-मार्गदर्शन दिले घेतले जातात. काही व्यावसायिक उपक्रम एकत्र घेतले जातात. व्यवहार होतात. नात्यांचा बंध तयार होतो. काही बंध टिकतात काही तुटतात. पण हा प्रवाह आहे. हा सतत वाहता असतो. माणसं येतात. राहतात. जातात. परत येतात. पुनः जातात. माणसं दुखावतात. गैरसमज होतात. हे चक्र चालुच असते. अर्थात ही एक खंत जरूर आहे. व्यवसायिकांची ही धरसोड वृत्ती त्यांच्याच व्यावसायिक प्रगतीला घातक आहे. माणसं नेमकी का आत येतात आणि नेमकी का बाहेर पडतात यासंदर्भात माझा शोधअभ्यास - निरीक्षण - चिंतन सदैव चालू असते. त्यासाठी नवनवीन योजना अंमलात आणल्या जातात. मुळात नेटवर्किंग म्हणजे काय? ते का करायचे? कसे करायचे? याबद्दल अनेकदा सांगूनसुद्धा लहान व्यावसायिक ही गोष्ट गंभीरपणे घेत नाहीत. अर्थात इतरही अनेक कारणे असतील. गेल्या दोन वर्षातला लॉकडाउन हा लहान व्यवसायिकांसाठी एक मोठा आघात ठरला आहे. त्यातून बाहेर पडणे हे आव्हान आहे. दर आठवड्याला एक मोफत मार्गदर्शन बैठक घेऊनसुद्धा संस्था कमी पडत आहे. यावर प्रत्येकाला वैयक्तिक समुपदेशनाची गरज आहे याची जाणीव आहे. आजच्या या कठीण समयी नात्यांची एक अभेद्य भिंत तयार करून, एकमेकांच्या साथीने, एकमेकांच्या संपर्कात राहुन हे युद्ध एकत्र लढण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही आहात आणि आम्ही आहोत, आपली अतूट नाती आहेत, आपली संस्था आहे, तोपर्यंत काहीच संपलेलं नाही..
नातं म्हणजे... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला... नातं म्हणजे... स्पर्धा नाही... जिंकणं किंवा हरणं ठरवायला... समोरच्याच्या मनाची काळजी... तुम्ही, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता... याची जाणीव म्हणजे 'नातं'.... आणि शेवटी नात्यांच्या पारंपरिक/आधुनिक व्याख्या आणि नातेसंबंधांच्या गुंत्यातून मुक्त होऊन व्यक्तीसापेक्ष विचार करून मार्ग काढला तरच नाती मोकळा श्वास घेऊ शकतील आणि अधिकाधिक घट्ट होऊन आजन्म टिकतील.. असे वाटते.
ज्यांच्याशी बोलताना आपला आनंद आत्मविश्वास आणि ऊर्जा दुप्पट होते आणि दुःख, वेदना, समस्या अर्ध्या होतात तीच आपली माणसे, आपली नाती असतात. हा अनुभव देणाऱ्या "उद्योग☀ऊर्जा" मधील सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार!!!
- BrandBond निलेश B+
क्रिएटिव्ह डिझायनर, सुलेखनकार, ब्रान्ड तज्ञ, संचालक- उगमक्रिएटिव्ह
सह-संस्थापक अध्यक्ष - उद्योग🌞ऊर्जा
ए-3, जय महालक्ष्मी, बँक ऑफ़ बड़ोदा समोर, जोंधळे शाळेजवळ, जुनी डोंबिवली मार्ग, डोंबिवली(प.) ४२१२०२. ठाणे. संपर्क - ८८७९२३०४४३, ९२२४४५३६७७
नातं जे निर्माण होतं विश्वासातून आणि टिकतही विश्वासातून ....मग ते 2 व्यक्तींमधील असो की इतर परस्पर भिन्न गोष्टींमधील .....नातं म्हंटलं की चढ उतार येणारच पण विश्वासाचा धागा जर पक्का असेल तर तर ती विण अधिकच घट्ट होत जाते...
इथे निलेश सर जे नेहमीच सकारात्मक असतात त्यामुळे त्यांनी आपल्या नावपुढेही B+ लावलंय . त्यांनी त्यांचं नातं या विषयावर आपल्या संस्थेशी जोडलंय आणि ते उलगडण्याचा प्रयत्न केलाय. एखादी संस्था सुरु करणं सोपं आहे पण ती निरंतर चालवणं आणि प्रगतीपथावर नेणं हे निश्चितच सोपं काम नाही... निलेश सर हे कायमच आमच्या साठी प्रेरणादायी आहेत. लेख मनाला खूप भावला..👌👍 ...आपल्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 👍👌 ....पुढील आव्हानासाठी एव्हाना आपण तयारीही केली असेल याची खात्री आहे ☺.
मंजिरी पाठक
Freelance Anchor | writer | content writer | VO & dubbing Artist | poetess
आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे....