
`उद्योग ऊर्जा’ नावाच्या एका विचारपीठावर अनेक व्यावसायिक-उद्योजक जमले होते. बहुतांश सगळे सूक्ष्म-लघू मध्यम उद्योग गटातले. प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय वाढवायचा होता. स्वत:च्या उद्योजकीय कक्षा रुंद करायच्या होत्या. मात्र त्यासाठी नेमकं काय करावं याबाबतीत ते अनभिज्ञ होते. त्यांची ही अनभिज्ञता एक उद्योजक दूर करत होते. किंबहुना त्यांनीच या उद्योजकांना एकत्र आणलं होतं. त्या उद्योजकाचं मुळातंच ध्येय आहे ते म्हणजे लहान उद्योजकांना घडविण्याचं, त्यांना उभं करण्याचं. उद्योजक होण्याच्या प्रक्रियेतून स्वतः तावून सुलाखून गेल्यानंतर त्यांना जे काही गवसलं, जे ज्ञान त्यांनी प्राप्त करुन स्वत:मधला उद्योजक घडवला, ते सारं त्यांना आता आपल्या इतर उद्योजक बांधवांना द्यायचं होतं. इतर उद्योजकांना घडवू पाहणारा हा अवलिया उद्योजक म्हणजे उगम क्रिएटीव्ह जाहिरात संस्थेचे सर्वेसर्वा ब्रॅण्डबॉण्ड निलेश बागवे होय.
रत्नागिरीच्या संगमेश्वरचे बागवे कुटुंब म्हणजे जणू सरस्वतीचा वरदहस्त लाभलेलं साहित्यिक कुटुंब. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी जगणारं हे कुटुंब. कीर्तनकार वारकरी घरात जन्म लाभलेले बाळकृष्ण बागवे या कुटुंबातील एक महत्वाचा घटक. त्यांना ३ भाऊ १ बहीण. बाळकृष्णाचे सर्वात धाकटे बंधू अशोक बागवे म्हणजे सुप्रसिद्ध कवी साहित्यिक.
बाळकृष्ण बागवे हे आपल्या प्रचंड कष्टांच्या जोरावर महानगर टेलिफोन निगम मध्ये शिपाई म्हणून नोकरीस लागले. आणि प्रचंड मेहनत, शिक्षणाचा व्यासंग या जोरावर त्यांनी तिथे सह-व्यवस्थापक पदापर्यंत झेप घेतली. त्यांना त्यांच्या या प्रवासात पत्नी प्रतिभा बागवे यांनी मोलाची साथ दिली. या दाम्पत्याला एकूण चार अपत्ये. दोन मुले अन दोन मुली. सर्व उच्चशिक्षित निलेश हा सर्वात धाकटा. हे सगळं कुटुंब पूर्वी सॅंडहर्स्ट रोडला रहायचं. नंतर ते मुंब्र्याला आले आणि त्यानंतर ते कायमचे डोंबिवलीकर झाले.
निलेशचं शालेय शिक्षण ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये झालं. त्याच्या हातात जणू सरस्वतीच वसायची. त्याचं अक्षर अगदी वळणदार अन सुबक होतं. लिहीताना तो जेवढा सफाईने लिहायचा तेवढ्याच सफाईने त्याचा हात कॅनव्हासवर चालायचा. त्याच्यावर चित्रकलेचे खरे संस्कार केले ते शाळेच्या चित्रकलेच्या दातार आणि कुलकर्णी सरांनी. शालेय जीवनात हस्ताक्षर चित्रकला या विषयात अनेक बक्षिसे मिळवल्यामुळे या दोघांनीच त्यांच्या बालमनावर बिंबवलं कि मोठेपणी त्यांना कलेची पंढरी समजल्या जाणाऱ्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये चित्रकलेचं पुढचं शिक्षण घ्यायचं. जेजे मध्ये प्रवेश घेताना प्रवेश परिक्षा द्यावी लागते, मुलाखत द्यावी लागते. या सगळ्याची तयारी नसल्याने आणि योग्य मार्गदर्शनाअभावी दहावीनंतर एक वर्ष निलेशला जेजे मध्ये प्रवेश घेता आला नाही. मात्र वर्ष वाया जाऊ नये म्हणून ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला.
या एक वर्षांत निलेशला उमगले कि हे क्षेत्र आपलं नव्हेच. आपला आत्मा खरा वसतो तो चित्रकलेत, अक्षरकलेत. कलेची ती पंढरीच आपली खरी कर्मभूमी आहे. पुन्हा निलेश जोमाने कामाला लागला. प्रचंड मेहनत केली. पूर्वतयारी करुन पुन्हा जेजेचे दार त्याने ठोठावले. यावेळी सगळं नीट पार पडलं आणि निलेश जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये दाखल झाला. येथील परिसर अस्सल कलाकारांना घडवणारा आहे. प्रसिद्ध सिनेचित्रदिग्दर्शक महेश लिमये हे निलेशचे वर्गमित्र. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे ज्युनियर तर दिग्दर्शक गिरीश मोहिते हे सिनीअर. या अशा कलाकारांच्या वर्तुळात निलेशचं कलाविश्व समृद्ध होत होतं. या सगळ्यामध्ये जेजेची पाच वर्षे कशी पूर्ण झाली कळलंच नाही.
जेजे मध्ये शिकत असतानाच निलेश दैनिक आपलं महानगर साठी कॉलेज कट्टा सदर लिहू लागला. अर्धवेळ नोकरीच करु लागला तिथे. पहिली कमाई होती ती महिना दोन हजार रुपये. या दैनिकामुळे संपूर्ण मुंबई भटकता आली. या काळात सायंदैनिकाची एक लाट आली होती. या सगळ्या सायं दैनिकाची पहिली प्रत निलेशकडे आहे. सोबतच त्याने षटकार आणि चंदेरी या मासिकासाठी आणि इतर प्रकाशकांच्या दिवाळी अंकासाठी आणि पुस्तकांच्या मुखपृष्ठासाठी काम पण काम केले. येथे तो अक्षरांसोबत खेळायला शिकला. टायपोग्राफी आणि कॅलिग्राफी अर्थात अक्षरशास्त्र आणि सुलेखन या दोन्ही विषयांसह त्याने जेजे मधून उपयोजित कला विषयाची पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना गुगलवाले या विद्यार्थ्यांकडून फॉण्ट बनवून घ्यायचे. आज आपण युनिकोड मध्ये जे मराठी फॉण्ट्स वापरतो त्यातील काही फॉण्ट्स निलेश यांनी विद्यार्थीदशेत तयार केलेले आहेत.
पदवी मिळवल्यानंतर निलेश यांनी वैविध्यपूर्ण अनुभव मिळविण्यासाठी जवळपास ६ ते ७ ठिकाणी नोकऱ्या केल्या. या मध्ये मुद्रा, क्रिएटीव्ह युनिट सारख्या नामांकित संस्थेचा समावेश आहे. या प्रत्येक ठिकाणी आंतरराष्ट्रीय/भारतीय जाहिरातींचे विविध पैलू निलेशना प्रत्यक्षात शिकता आले. एखाद्या संस्थेचे बोधचिन्ह (लोगो) बनविणे त्यांचे आवडीचे काम आहे. अनेक कंपन्यांसाठी त्यानी बोधचिन्ह तयार केलेले आहे.
२००० साली त्यांचा विवाह उल्का या सुविद्य तरुणीसोबत झाला. त्यानंतर एकच वर्ष निलेश यांनी नोकरी केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ची जाहिरात संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला. घरातून याला सुरुवातीस विरोध झाला. मात्र निलेश आपल्या निर्णयावर ठाम राहिले. २००१ साली निर्मिती ग्राफिक्स नावाने त्यांनी कंपनी सुरु केली. अनेक छोट्या मोठया कंपन्यांच्या जाहिरातीसाठी त्यांनी कार्य केले. मात्र निर्मिती ग्राफिक्स नावाने ठाणे, मुलुंड मध्ये काही संस्था सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या संस्थेचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
त्याचवेळी त्यांना त्यांच्या बाबांनी नाव सुचवलं ‘उगम’. उगम म्हणजे सुरुवात, प्रारंभ. हेच नाव घेऊन कंपनी पुन्हा सुरु झाली. उगम क्रिएटिव्ह गेल्या २१ वर्षांपासून जाहिरात, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग क्षेत्रात कार्यरत आहे. अगदी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्स पासून ते अगदी बॅंका, हॉटेल्स, इस्पितळे, कॉर्पोरेट, स्टार्ट अप्स, मिनी-मायक्रो स्टार्ट अप्स पर्यंत हजारो ब्रॅण्ड्स साठी त्यांनी सेवा दिलेल्या आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी आजपावेतो शंभरहून अधिक युवकांना ग्राफिक डिझाईनर म्हणून घडवले. त्यातील २०-२५ ग्राफिक डिझाईनर आज स्वत:चा व्यवसाय करत आहेत हे विशेष.
समाज हा केंद्रबिंदू मानून काम करणे हे बागवे कुटुंबाचे वैशिष्ट्य होय. बाळकृष्ण बागवे हे एमटीएनएल मध्ये कामगार नेता म्हणून प्रसिद्ध होते. एवढंच नव्हे तर निलेशचे बंधू उन्मेष बागवे यांनी अलिकडेच विधानसभेची निवडणूक लढवली होती. निलेशचे काका अशोक बागवे हे प्रसिद्ध मराठी साहित्यिक आहेत. तर निलेशच्या बाबांनी देखील चार कादंबऱ्या व पाच कथासंग्रह लिहीलेले आहेत. स्वतः निलेश बागवे हे सध्या दोन पुस्तकांवर काम करत आहेत. लवकरच ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. अक्षर हा जणू या कुटुंबाचा स्नेही आहे. भावी पिढीमध्ये अक्षरांची ही परंपरा खोलवर रुजावी तसेच सुंदर हस्ताक्षर म्हणजे आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्व हे अनुभवल्यानंतर निलेश बागवे यांनी अक्षरगंध नावाने उपक्रम सुरु केला. एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. संस्थेने आयोजित केलेले अनेक स्पर्धा प्रदर्शन उपक्रम गाजले.
उद्योग ऊर्जा हा उद्योजकीय मंच त्यांनी दोन वर्षांपूर्वी सुरु केला. उद्योजकांनी एकत्र येऊन एकमेकांना उद्योजकीय मदत करुन स्वत:ची उद्योजकीय भरभराट करावी हा या मागचा उद्देश. आज शेकडो उद्योजक या संस्थेच्या माध्यमातून आपापल्या उद्योगाची उलाढाल करत आहेत. तसेच निलेश बागवे लॉकडाऊन काळात ब्रॅंडकी या माध्यमातून १०५ हून अधिक भावी उद्योजकांना ब्रँडिंग आणि यशस्वी उद्योग करण्यासंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण देखील देत आहेत.
ब्रॅण्डबॉण्ड निलेश हे स्वत:च्या नावापुढे B+ (बी पॉझिटीव्ह) असे अगदी आवर्जून लिहीतात. आपल्या नावामधून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली पाहिजे आणि माणसाने नेहमी सकारात्मक राहिले तर सकारात्मकच घडते यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच त्यांच्या सान्निध्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही सकारात्मक घडत असते. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने २०२५ पर्यंत किमान २०२५ उद्योजक घडविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांची काम करण्याची ऊर्जा पाहिली की हे ध्येय ते त्यापूर्वीच गाठतील असा विश्वास वाटतो. लहान उद्योजकांना आणि उद्योगांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा हा खऱ्या अर्थाने अष्टपैलू कलाकार, कार्यकर्ता आणि उद्योजक आहे.
—-
प्रमोद सावंत - ८१०८१०५२३२
सौजन्य : दै. मुंबई तरुण भारत. शुक्र. ०६.११.२०२०